Stock Market Crash : सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक १,०९७ अंकांच्या घसरणीसह ७८,९१९ वर बंद झाला, तर निफ्टी ३१५ अंकांनी घसरून २४,४५० च्या पातळीवर स्थिरावला. एप्रिल २०२५ नंतरची ही बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.
बँकिंग शेअर्सचा 'फिव्हर'; गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
आजच्या सत्रात बँकिंग क्षेत्रात मोठी विक्री दिसून आली. 'निफ्टी बँक' निर्देशांक तब्बल १,२७३ अंकांनी घसरून ५७,७८३ वर बंद झाला. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक यांसारख्या दिग्गज बँकांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्याने बाजाराचा मूड बिघडला.
बाजारातील घसरणीची ५ प्रमुख कारणे
- पश्चिम आशियातील तणाव : अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारात भीतीचे वातावरण आहे, ज्याचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर होत आहे.
- कच्च्या तेलात तेजी: ब्रेंट क्रूडच्या किमती ८६.२८ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. भारत हा तेल आयात करणारा देश असल्याने वाढत्या इंधन दरामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.
- परदेशी गुंतवणूकदारांची विक्री: विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार सातत्याने भारतीय बाजारातून पैसा काढून घेत आहेत. मार्च महिन्यात आतापर्यंत त्यांनी सुमारे १६,००० कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.
- कमकुवत जागतिक संकेत: अमेरिकन आणि आशियाई बाजारपेठांमधील घसरणीचा दबाव भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
- व्याजदर कपातीची शक्यता धूसर: महागाईचा भडका उडण्याची भीती असल्याने रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली आहे, ज्याचा फटका बँकिंग क्षेत्राला बसला आहे.
वाचा - टाटाला मिळणार तगडी स्पर्धा? बिर्ला समूह पुन्हा एकदा आपल्या जुन्या व्यवसायात परतणार
काही क्षेत्रांत चमक, काही ठिकाणी 'रेड अलर्ट'
बाजारात चौफेर घसरण सुरू असतानाही, डिफेन्स सेक्टरने आपली ताकद दाखवून दिली. डीसीएक्स सिस्टिम्स आणि माझगाव डॉक यांसारख्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांपर्यंत तेजी पाहायला मिळाली. दुसरीकडे, मिडकॅप इंडेक्स ३९९ अंकांनी घसरला असून अशोक लेलँड आणि गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये ४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
